आठ लाख लाडक्या बहिणींना प्रतीक्षा तिसऱ्या हप्त्याची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर ‘लाडक्या बहिणीं’ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी दि. १५ ते ३० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात तीन टप्प्यांत या अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत आल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या ८ लाखांच्या घरात गेली आहे.

राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलेला १५०० रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करत, राज्य शासनाने ही योजना अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात साडेपाच लाखांवर महिलांनी नोंदणी केली होती, त्यानंतर नव्या पोर्टलद्वारे आतापर्यंत अडीच लाखांवर महिलांची नोंदणी झाली आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदणीसाठी मुदत…

या योजनेसाठी अर्ज करण्याकरता दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज दाखल होत आहेत. मुदतीत आलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान दिले जाणार आहे.