सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर तर ‘या’ महिलांनी नाकारला लाभ

0
974
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मागील वर्षी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरू केली. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत सहा हप्ते बहिणींना मिळाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने बहिणींना दीड हजारावरून २ हजार १०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीला सत्ता देण्यात ही योजनचा गेमचेंजर ठरल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता निकषात न बसताही लाभ घेतल्याने अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. आतापर्यंत फक्त तीन महिलांनी लाभ नाकारला असून जिल्ह्यात अजूनही आठ लाखांवर ‘लाडक्या बहिणी’चे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील ३ महिलांनी योजनेतून बाहेर पडण्याबाबत अर्ज केला आहे. या महिला सातारा, फलटण आणि कोरेगाव तालुक्यातील आहेत. यामधील दोघींनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतला. पण, आता शासकीय नोकरीत निवड झाल्याने त्यांनी लाभ नाकारला आहे. त्यांनी लाभ मिळालेली रक्कमही परत केली आहे. तसेच एका महिलेने वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर असल्याने लाभापासून दूर राहण्याबाबत अर्ज केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिघी बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे.

सातारा जिल्ह्यातील योजनेच्या लाभार्थीबाबत माहिती

योजनेसाठी अर्ज प्राप्त – ८,३३,२१३
अर्ज मंजूर – ८,१९,५४९
नामंजूर – २,०३५
प्रलंबित तपासणी अर्ज – २,७१३
योजनेचा लाभ – २१ ते ६५ वयोगटातील महिला

या तीन कारणाने ठरणार अपात्र

१) अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणे
२) चारचाकी वाहन असणे
३) लग्नानंतर इतर राज्यात वास्तव्य

२६ जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा

राज्य शासनाने जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे. २६ जानेवारीपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. पण, २ हजार १०० रुपये देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे दीड हजार रुपयेच मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय अर्ज मंजूर

तालुका – मंजूर अर्ज
जावळी – ३०,७६४
कराड – १,५३,३९५
खंडाळा – ३८,६५३
खटाव – ७९,१५९
कोरेगाव – ७२,७२८
महाबळेश्वर – १६,८९२
माण – ६२,६५६
पाटण – ८६,९६१
फलटण – ९५,९५६
सातारा – १,२७,०८९
वाई – ५५,२६६