कराडच्या मलकापुरातील खाद्यतेल व्यापाऱ्यास गंडा; 4 लाखांची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | अगोदर पैसे पाठवून देखील खाद्यतेल न पाठवता मुंबईतील व्यापाऱ्याने कराड तालुक्यातील मलकापूर येथील खाद्यतेल व्यापाऱ्यास तब्बल चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. मलकापूर येथील संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्यास खाद्यतेलाबी ऑर्डर दिली होती. त्याला त्याने ३ लाख ९० हजार रुपयेही पाठवले होते. मात्र, खाद्यतेल संबंधिताने पाठवले नाही. त्याचे पैसे परत केले नाहीत. त्यामुळे पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.

सतीश दत्तात्रय फल्ले (रा. मलकापूर) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दिलीप पोळ (प्रो. प्रा. रोमाजी इंडस्ट्रीज प्रा. लि., भांडूप (वेस्ट) मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील फल्ले यांचा होलसेल व रिटेल खाद्यतेलाचा व्यवसाय असून, त्यांची गणेश ट्रेडर्स नावाची फर्म आहे. त्यांची मुंबईतील दिलीप पोळ यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनीही त्यांची रोमाजी इंडस्ट्रीज असल्याचे सांगितले होते. तसे तक्रारीतही त्यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी २२ डिसेंबरला २० टन खाद्यतेलाचे १७ लाख पाच हजारांची ऑर्डर फल्ले यांनी पोळ यांना दिली होती. त्यानंतर फल्ले यांनी येथील राजारामबापू बँकेतील खात्यातून पोळ यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविली होती. त्यानंतर पोळ यांनी फल्ले यांना ऑर्डरप्रमाणे तेलाचा टँकर पाठविला नाही.

ऑर्डर देऊनही खाद्यतेल न दिल्याने फल्ले यांनी पोळ यांच्याकडे पैसे परत पाठविण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे चार जानेवारी २०२४ ला पोळ यांनी फल्ले यांना १३ लाख १५ हजार रुपये पाठविले होते. उर्वरित तीन लाख ९० हजारांची वारंवार मागणी करूनही ती रक्कम दिलेली नाही. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोळ पैसे देणार नाही, याची खात्री झाल्याने फल्ले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.