धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या अनेक मंदिरामध्येही पुराचे पाणी शिरले आहे.

धोम, बलकवडी धरणात ८५ टक्के पाणीसाठा

वाईच्या पश्चिम भागातील कृष्णा नदीवरील पहिले बलकवडी धरण ८५ टक्के भरलं आहे. बलकवडीमधून १,२९८ तर धोम धरणातून ७,९४२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीला पूर आला असून वाईतील प्रसिद्ध महागणपती घाट पाण्याखाली गेला आहे. पुराच्या पाण्याने महागणपतीच्या पायाला स्पर्श केला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धोम धरण ८५टक्के भरले आहे. पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धोम आणि बलकवडी या दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात आल्यानं कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाण्यात उतरू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोयना धरणात 86 टीएमसी पाणीसाठा

महाराष्ट्रातील उद्योग विश्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात 86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यानं प्रति सेकंद 47 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे 11 फुटांनी उघडण्यात आले असून ५२,१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग सुरू आहे.