सातारा प्रतिनिधी । गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत पावसाची संततधार सुरु असून पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात 138 मिली मीटर पावसाची नोंद असून काल शुक्रवारपासून वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
महाबळेश्वर व पाचगणीत सध्या संतधार पाऊस कोसळत असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी असलेले धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ठोसेघर धरण प्रवाहित झाले असल्यामुळे पर्यटकांची पावले या पर्यटनस्थळाकडे वळू लागली आहेत. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शुक्रवारी थोडा वेळ उघडीप घेतल्यामुळे शनिवार सुट्टी दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पाचगणी, महाबळेश्वर येथील ठिकाणी गर्दी दिसून आली.
शनिवार आणि रविवार असल्याने या दोन्ही दिवशी पर्यटकांकडून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावली जात आहे. दरम्यान आज शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी दाखल झाले आहेत. मेटगुताड ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन पॅाईट लिंगमळा धरण केल्यामुळे महाबळेश्वरला निसर्गाचे एक प्रकारे वरदानच लाभले आहे. येथील हिरवीगार वृक्ष, उंच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा धबधबा अशी मनमोहक दृश्ये डोळ्याची पारणे फेडत आहेत. पावसामुळे येथील निसर्ग हिरवाईने नटून गेला आहे.