महिलेच्या पर्समधील 8 तोळे दागिन्यांवर ST चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ठाणे ते बेळगाव या एस.टी.बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील अडीच लाखाच्या आठ तोळे दागिन्यांवर एस.टी. चालकाने डल्ला मारल्याची घटना सोमवारी दि. २५ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली असून शाहूपुरी पोलिसांनी चालकाला मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.

राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, सध्या रा. ठाणे, मूळ रा. राशिंग, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांनी फिर्याद देताच पोलिसांनी चार तासांत छडा लावून दागिने चोरणाऱ्या एसटी चालकास अटक केली. सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, पोस्ट अतित, जि. सातारा) असे अटकेतील चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ठाण्याहून सुटलेली एसटी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. पुढे बेळगावला जाण्यापूर्वी चालक सुधीर शिंदे याने एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याचे कारण सांगून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वर्कशॉपच्या दिशेला जाऊन काही वेळाने ते परत आले.

एसटीत बसताच फिर्यादी राजश्री नलवडे यांनी पर्स तपासली. त्यावेळी पर्समधील दागिन्यांची एक डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलवले. बसची झडती घेण्याची विनंती केली. सोन्याचा हार, कुड्या, वेल, कानातील दागिने अशा आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद दिली.