सातारा प्रतिनिधी । कृषी विभागाच्या वतीने फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, मसाला पिकांना अनुदान देण्यात येणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या फलोत्पादन कार्यक्रमास मान्यता मिळाली आहे. या योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत, पॉवर टिलर आठ एचपीपेक्षा जास्त व कमी, पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस,
पूर्वशीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी/ फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हरचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. अधिक योजनेसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.