पाटण प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गुरुवारी कोयना धरणग्रस्थांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी राज्याचे पुनर्वसन मंत्र्यांसोबतची रद्द झालेली बैठक ही दि. १२ फेब्रुवारीपर्यंत होऊन त्यामध्ये सकारात्मक चर्चेअंती जमिनी वाटपास सुरूवात झाली पाहिजे . ती झाली तर दि. १३ फेब्रुवारी रोजी आनंदोत्सव साजरा करू अन्यथा हजारोंच्या संख्येने कोयना धरणग्रस्त स्त्री-पुरुष बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले जाईल असा इशारा डॉ. पाटणकर यांनी शासनाला दिला आहे.
कोयनानगर येथे गुरुवारी धरणग्रस्थांचा मेळावा पार पडला. यावेळी संतोष गोटल, सचिन कदम, राम कदम, पी.डी. लाड, सीताराम पवार, किसन सुतार, विनायक शेलार, शिवाजी कांबळे, महादेव यादव, परशुराम शिर्के, जयराम कांबळे, दाजी पाटील, राजाराम जाधव, अनुसया कदम, गजराबाई खराडे, शुभांगी लाड विमल सुतार यांचेसह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘कोयना प्रकल्पग्रस्तांनी २०१८ पासून पाचवेळा बेमुदत आंदोलन केली. परिणामी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पातळीवर बैठका होऊन जमीन पसंती केल्या. मात्र, त्यास आता आठ ते अकरा महिने पूर्ण झाले तरी देखील जमीन वाटप सुरूकरण्यात आलेले नाही. ‘गेली ६५ वर्षे या धरणग्रस्ताना वनवास भोगावा लागला आहे. आता कुठे लढा, आंदोलन करून प्रश्न सोडवणुकीस सुरूवात होत असतानाच प्रशासन आणि शासन चालढकल करण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे धरणग्रस्तांना लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकार जर लढल्याशिवाय पुढे सरकणार नसेल तर आम्ही लढू पण आता माघार घेणार नाही. यासाठी दि. १३ फेब्रुवारी रोजी कोयना धरणग्रस्तांचा एक तर विजयोत्सव तरी होईल किंवा निर्णायक लढा तरी सुरू होईल, असा इशारा डॉ. पाटणकर यांनी यावेळी दिला.