सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने “पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, ५० कोटी मिळवून देतो,” अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर भोंदूगिरी विरुद्ध कार्य करणाऱ्या साताऱ्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा पोलिसांकडे एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. “भोंदुगिरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमण्यात यावी,” अशी मागणी ‘अंनिस’च्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत लवकरच ‘अंनिस’च्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले जाणार आहे.
आज सातारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भोंदूगिरी करणाऱ्या काका महाराजास बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले आहे. काका महाराजाच्या प्रकरणांमध्ये अनेक जणांची फसवणूक झाली आहे. हे मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे असा संशय आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भुलथापा देऊन काही मांत्रीक लोकांना लाखोचा गंडा घालत आहे.
स्वतंत्र दक्षता अधिकाऱ्याच्या नेमणुकी संदर्भात पोलिसांची भेट घेणार : डॉ. हमीद दाभोळकर
सातारा पोलिसांनी अटक केलेल्या काका महाराज आणि दक्षता अधिकाऱ्यांची अंनिसने केलेली मागणी याबाबत ‘हॅलो महाराष्ट्’ ने अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. दाभोलकर म्हणाले की, जिल्हास्तरावर जादूटोणा विरोधी कारवाई करण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी म्हणून एक पद असणे आवश्यक आहे. कायद्यात देखील तशी तरतूद आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. या पदासाठी स्वतंत्र अधिकारी असणे आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन लवकरच आम्ही पोलीस प्रशासनास देणार असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.
पोलिसांच्या कारवाईनंतर ‘अंनिस’तर्फे महत्वाचे आवाहन
संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भुलथापा देऊन काही मांत्रीक लोकांना लाखोचा गंडा घालत आहे. फसव्या विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हात चलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. पैश्याचा पाऊस ही अंधश्रध्दा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा शाखेचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे.
सर्वाधिक भोंदूगिरीचे प्रमाण पाटणमध्ये
सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये काही दिवसांच्या गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता, पाटणमध्ये देखील दोन वर्षांच्या पूर्वी नरबळीची घटना झाली होती. पाटण मधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणांत भोंदूगिरी चालते. अशा भोंदूगिरी करणाऱ्या लोकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे आवश्यक असल्याचे मत, मत सातारा ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.