कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव येत्या काही दिवसांमध्ये ठेपला असल्याने त्याची सर्वत्र तयारी केली जात आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन खबरदारी घेत असते. यंदा ही खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यासाठी कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी सूचना केल्या. त्यामध्ये डॉल्बी, डिजे न वापरण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कराड तालुक्यातील 21 गावांनी डाॅल्बी, डीजेला स्वयःपूर्तीने न वाजण्याचा निर्णय घेतला आहे.
कराड तालुक्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 742 सार्वजनिक गणेश मंडळे झाली आहेत. तर घरगुती गणपती संख्या 15 हजार 500 आहे.
कराड पोलीस ठाणे हद्दीतील 130 गावांची संख्या असून तालुका पोलिसांकडून रोज 5 ते 6 बैठका चालू आहेत. आतापर्यंत 27 गावात बैठका पार पडल्या आहेत. त्यापैकी 21 गावांनी गावानी सर्वानुमते डीजे/डॉल्बी न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कराडमध्ये नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, डी.जे/डॉल्बी लावण्यास परवानगी नाही.
तसेच अनंत चतुर्थी नंतर गणपती विसर्जनास परवाणगी दिली जाणार नाही. गणेशोत्सवा दरम्यान कोणीही हुल्लडबाजी करु नये, अफवांवर विश्वास ठेवु नये. कोणत्याही जातीय धार्मिक वाद निर्माण होतील असे वर्तन करु नये अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत. प्रत्येक पोलीस अंमलदार यांचेकडे पोलीस ठाणे हद्दीतील गावे दत्तक देण्यात आलेली आहेत. जेणेकरुन त्यांचे त्या गावात वैयक्तीक लक्ष राहील.
‘या’ 21 गावात डाॅल्बी- डीजे वाजणार नाही
वडगाव हवेली, वसंतगड, तारुख, आणे, उत्तर तांबवे, म्हारुगडेवाडी, विठ्ठलवाडी, शेवाळवाडी- येवती, अकाईचीवाडी, टाळगांव, माटेकरवाडी, शेळकेवाडी- म्हासोली, घराळवाडी, चोमरमारवाडी, जिंती, शेवाळवाडी, येणपे, धोंडेवाडी, पाचुपतेवाडी, येणके, पार्ले, भुरभूशी या ठिकाणी यंदा डाॅल्बी- डीजे लावण्यात येणार नाही.