नागठाणे, बोरगाव परिसरात कुत्र्यांचा 25 जणांवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घालत सुमारे 25 जणांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचे अक्षरशः लचके तोडल्याची घटना नागठाणे, बोरगाव ता. सातारा येथे नुकतीच घडली आहे. यामध्ये बोरगाव येथील एका महिलेसह चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यासह अनेक रुग्णांना सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे, ता. सातारा येथे दि. 28 रोजी सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू होती. पंचक्रोशीतील अनेक गणेशभक्त मिरवणुकीत सामील झाले होते. याचवेळी या पिसाळलेल्या कुत्र्याने गर्दीत अनेक जणांना चावा घेत धुमाकूळ घातला. अंधार असल्याने हे कुत्रे गर्दीत घुसलेले अनेकांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे काही जणांचे अक्षरशः लचके तोडले. काही जणांच्या हे लक्षात आल्यावर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला हाकलण्यात यश आले. गर्दीमुळे त्याला मारणेही मुश्‍कील झाले होते. मात्र, तोपर्यंत तो कुत्रा त्याठिकाणाहून पळून गेला. नागठाण्यातून हाकलल्यानंतर या कुत्र्याने बोरगावकडे मोर्चा वळवला.

दि. 29 रोजी त्याने बोरगाव येथील चालत जाणाऱ्या महिलेवर पळत येऊन कुत्र्यांने अंगावर झेप घेत गाल, भुवया, कपाळ, ओठ अशा असंख्य ठिकाणचे लचके तोडले. संबंधित महिला रस्त्यावर खाली पडली तरी कुत्र्याने हल्ला सुरुच ठेवला होता. त्यानंतर बबन माळवे, दत्तात्रय साळुंखे, नथु साळूंखे, यश लोहार यांनाही जोरदार चावे घेतले. बोरगाव येथील नागरिकांनी काठ्या आदी घेऊन या कुत्र्यास घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो एका ऊसाच्या शेतात घुसल्याने त्यास मारता आले नाही.

त्यातच हे पिसाळलेले कुत्रे चावल्याने अजून एक कुत्रे पिसाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू होती. त्यामुळे आता परिसरातील नागरिक, लहान मुले तसेच शालेय मुलांमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्यावतीने या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागठाणे बोरगाव परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.