माऊलीची संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तरडगाव येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाहणी केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त उपस्थित होते.

पालखी तळ आणि विसाव्याची ठिकाणी पालखी प्रस्थानानंतर स्वच्छ राहून रोगराईला थारा मिळणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पालखी मुक्काम, विसावा आणि पालखी मार्ग अशा सर्वच ठिकाणी सफाई करुन ओला, सुका असा घनकचरा कचरा प्रक्रिया प्रकल्पांना पाठविण्यात येत आहे. कचरा संकलनासाठी त्या त्या ठिकाणच्या नगरपरिषद, ग्रामपंचायतींनी आपल्या घंटागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत; अशी माहिती यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

फलटण तालुका प्रशासनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या केलेल्या नियोजनाबद्दल प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विशेष कौतुक केले आहे.