शरद पवार – उदयनराजेंच्यात ‘साखर’ पेरणी तर जयंतराव अन् अजितदादांची चाय पे चर्चा

0
1135
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्यातील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. पक्षातील नेतेमंडळी, पदाधिकारी फोडाफोडीमुळे वरिष्ठ नेते सावध राहत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील पक्षांतराची चर्चा केली जात असताना कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी पार पडलेल्या एका लग्न सोहळ्यात राजकीय गाठीभेटींचा एक नाट्यपूर्ण अध्याय पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.शरद पवार यांची भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आ. शशिकांत शिंदे यांच्याशीही खा. उदयनराजेंनी गप्पा मारल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चाय पे चर्चा झाली.

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज यांच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे आज यशवंतनगर येथे आले होते. लग्नात वधू – वरांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे चहा घेण्यासाठी काहीकाळ लग्न स्थळावरील व्हीआयपी कक्षात थांबले होते. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी जयंत पाटील हे भेटल्यानंतर त्यांना जवळ बोलावून घेत चर्चा केली. काहीकाळ चर्चा पार पडल्यानंतर दोघांनी तेथे अल्पोपहार व चहा घेतल्यानंतर ते निघून गेले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, बाळासाहेब सोळसकर आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे खासदार शरद पवार यांची भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार यांची पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या आणि दोघांमध्ये सुसंवादही झाला. मागील काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या समोरासमोर आलेले हे दोन्ही दिग्गज नेते अचानक एकत्र येताच राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला. शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण शेजारी शेजारी बसले होते. तेवढ्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची नेहमीसारखी स्टायलीस एन्ट्री झाली. शरद पवारांसमोर येताच उदयनराजेंनी त्यांना नमस्कार केला. पवारांनीही त्यांचे हसून स्वागत केले. उदयनराजे समोर दिसताच शरद पवार यांनी बाळासाहेबांकडे इशारा करत उदयनराजेंना खुर्ची देऊन त्यांचा सत्कार करण्याचा इशारा केला. उदयनराजे व शरद पवार यांच्यात हास्यविनोद रंगले.