पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वांग नदी पारालगत ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांना असलेली गळती काढल्याचे काम संबंधित पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे. सध्या मराठवाडी धरणात पावसाळ्यापर्यंत टिकेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, लाभक्षेत्रात नदीपात्रामध्ये बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गळती असल्याने धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात टिकत नाही.विसर्ग थांबवल्यावर बंधारे कोरडे पडत असल्याने पुन्हा- पुन्हा सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
सध्या वांग नत्रीपात्रालगत क्षेत्रातील रब्बीसह बागायती पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या सूचनेनुसार बुधवारी सकाळपासून सिंचनद्वारातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.