कराड प्रतिनिधी । राज्यात जूनचा महिना संपत आला तर अद्याप मॉन्सूनच्या पावसाचे आगमां झालेले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरण, तलाव व विहिरींतील पाणी साठ्यावर झाला आहे. तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. अशा परिस्थितीत पावसाचे आगमन झाले नाही तर कोयना आणि कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती उध्दभवणार आहे. आजपर्यंत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८८ मिलिमीटर व महाबळेश्वरला १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणात १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा फक्त ५.८८ टीएमसी आहे. सध्या मात्र, पाऊस पडेल अशी परिस्थिती दिसून येत नसल्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने आजपासून पूर्वेकडे सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणारा व सुरू असलेला १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद केलेला आहे.