कराड प्रतिनिधी । ” महायुतीच्या प्रयत्नातून तळबीड गावचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव कराड येथील आयटीआय कॉलेजला देण्यात आले आहे. आजपर्यंत विद्यमान आमदारांना हे नाव देता आले का? यांनी कधी तळबीडची अस्मिता राज्यमंत्रिमंडळात नेली का? एवढी तळबीडला कामे आहेत तर २५ वर्षे गावात नेमका काय विकास झाला? ३५ वर्षे आमदारकी हि एकाच घरात आहे. सत्ता असून देखील या गावातील लोक आमच्याकडे कामे मागत असतील तर यांनी ३५ वर्षात काय विकास कामे केली? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना केला.
कराड उत्तर भाजपा वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेची सभा कराड तालुक्यातील तळबीड येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर संयोजक महेशबाबा जाधव, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकराव शेजवळ, कराड बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले की, ऐतिहासिक अशा तळबीड गावात भाजपची परिवर्तन यात्रा घेऊन आलेलो आहे. परिवर्तन यात्रा गेली नऊ दिवस चालू आहे. आपण ऐतिहासिक गावात अनेक निर्णय घेतले. पुढे ग्रामपंचायतीत परिवर्तन घडविले. २ कोटींचा रस्ता मंजूर करून आणला शिवाय अंतर्गत रस्त्याला देखील निधी आणला. ५५ लाख रुपये जिल्हा नियोजन मधून तळबीडला साकव रस्त्यासाठी मंजूर केले.
तळबीड गावातील लोक जेव्हा गावातील रस्ता, सभामंडप अशा अनेक कामासाठी आमच्याकडे निधी मागू लागली. तेव्हा आम्ही विचार केला की, एवढी तळबीडला कामे आहेत तर २५ वर्षे गावात नेमका काय विकास झाला?. सलग २५ वर्षेआमदार असून देखील इतकी कामे कशी काय राहिली. मग २५ वर्षात यांनी नेमक काय केलं? सलग २५ वर्षे विद्यमान आमदार आणि त्याअगोदर वडील पीडी पाटील अशी ३५ वर्षे आमदारकी हि एकाच घरात आहे. सत्ता असून देखील या गावातील लोक आमच्याकडे कामे मागत असल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी म्हटले.