कराड प्रतिनिधी । उरमोडी धरणातील पाणी आपल्या सातारा तालुक्याला २.५ टीएमसी इतके मंजूर आहे. हे पाणी बांधापर्यंत कुठं पोहचत आहे? का थांबलंय? १५ वर्षे आमदार होते. अडीच वर्षे पालकमंत्री असून देखील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. आता कुठलं मंत्रिपद दिल्यानंतर हे पाण्याचा प्रश्न सोडवतील, असा टोला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना लगावला.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपची परिवर्तन यात्रा सुरु असून या यात्रेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हि परिवर्तन यात्रेला सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथे दाखल होताच ग्रामस्थ व मतदारांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये भाजपकडेच राहणार असल्याचे मुंबईत झालेल्या महत्वाच्या बैठकीत निश्चित झाले आहे. त्यामुळे हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार नसून आपल्याकडे आलेला आहे, अशी महत्वाची माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.
यावेळी कदम यांनी उरमोडीच्या पाण्यावरून आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी कदम म्हणाले की, उरमोडी योजना होऊन किती दिवस झाले? भाऊसाहेब महाराजांनी उरमोडीची निर्मिती केली. १ टीएमसीचे धरण आता त्यांनी ९ टीएमसीचे केले. यामध्ये अनेक गावे उठली. यावेळी भाऊसाहेब महाराज आणि उदयनराजे भोसले यांनी लक्ष घातले नसते भूमिका घेतली नसती तर हे धरण झालं नसत. झालेल्या धरणातील पाणी आपल्या सातारा तालुक्याला २.५ टीएमसी इतके मंजूर आहे. हे पाणी बांधापर्यंत कुठं पोहचत आहे? का थांबलंय? १५ वर्षे आमदार होते. अडीच वर्षे पालकमंत्री असून देखील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. आता कुठलं मंत्रिपद दिल्यानंतर हे पाण्याचा प्रश्न सोडवतील असा टोला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना लगावला.