कराड प्रतिनिधी । पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे अशांनी काम काय केल?, हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांचे स्वप्न होते. पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरचे स्वप्न काय पूर्ण करणार? हे जनतेला फसवत आहेत हे मतदारसंघात लक्षात आलं आहे. त्यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) पावसात भिजले काय, उन्हात उभे राहिले काय कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे. जिल्ह्यातील आठच्या आठ उमेदवार हे महायुतीचे निवडून येणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी व्यक्त केला.
उंब्रज येथील भाजप कार्यालयात नुकतेच महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे वाचन करण्यात आले. यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, संपतराव जाधव, शंकरराव शेजवळ, सुरेशराव पाटील, सचिन नलवडे, महेशकुमार जाधव, उंब्रजचे सरपंच योगराज जाधव भिमराव पाटील, भाजप शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षातील पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, कराड उत्तर मधील दुष्काळी भागासाठी अनेक पाण्याच्या योजनाना पैसे देण्याचे आश्वासन न देता तसेच नुसते न बोलता प्रत्यक्षात निधी दिला. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव दिला, सोयाबीन साठी जादा दर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला जरा दर वाढला की ज्यांना जास्तीचा पगार आहे अशीच मंडळी ओरड चालू करतात. लाडक्या बहिणी योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली. परंतु येत्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींच निर्णयाक कौल देतील.
विरोधकांना फक्त सत्ता हवी आहे त्यासाठी जाती जातीत भांडण लावली. परंतु महायुतीने समाजातील सर्व घटकांना फायदेशीर अशा अनेक योजना आणल्या व त्या अंमलात आणल्या मग जनतेसमोर आलो. त्यामुळे कराड उत्तर मधील बिनकामाच्या, निष्क्रिय आमदाराला घरी बसून महायुतेचा आमदार होईल. तर कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झाली आहेत त्यामुळे कराड दक्षिण मध्ये पुर्ण ताकदीने भाजप त्यांच्या पाठीशी उभे असणार आहे.
यावेळी घोरपडे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत मागचे विसरून पुढे काय करणार हे सांगितले जात पण महायुतीच्या सरकारने प्रथमच काय केले हे सांगण्यासाठी हे रिपोर्ट कार्ड तयार केल आहे. महायुतीच्या सरकारने कराड उत्तर मध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे गेल्या अडीच वर्षात देशाच्या, राज्याच्या विकासासाठी महायुतीची महत्त्वपूर्ण कामे झाली आहे.