कराड प्रतिनिधी । संविधान बदलणे हे एवढं सोपं कुणाचं काम नाही. संविधान भाजप बदलणार असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला. मात्र, भाजपने संविधान बदलले नसून पंतप्रधान मोदी यांनी संविधानाची प्रत आपल्या मस्तकी लावली आणि नमस्कार केला. देश पहिला हे ब्रीद वाक्य भाजपचे असून त्याच्या आडवे कोणी येत असेल तर त्याला सोडणार नाही. मात्र, काही लोकांना भाजपचे देशप्रेम खुपत आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला अनेक आमिषे दाखविली जातील. त्या अमिषाला कुणीच बळी पडू नका आणि बिनकामाच्या आमदाराला मत देऊ नका, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी केली.
भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्यावतीने काढण्यात आलेली परिवर्तन यात्रेचे कराड तालुक्यातील हजारमाची येथे भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी आयोजित विराट सभेत धैर्यशील काम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर काका शेजवळ, माजी जि.प.सदस्य सागर शिवदास, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत मदने, माजी पं.स.सदस्य सुरेश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले कि, भाजपने देशप्रेम अजूनही ठेवले आहे. हे देशप्रेम कधीही कमी होणार नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रथम देश श्रेष्ठ मानतात. त्यानंतर राज्य आणि मग स्वतःवर प्रेम करतात. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजपचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आज आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन कदम यांनी केले.
यावेळी सैदापूर जि.प.गटातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सातारा जि.प चे माजी कृषी सभापती रहिमतपूर भाजपा मंडलाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भिमराव काका पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात याप्रसंगी साजरा करण्यात आला.