सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा साताऱ्यात घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. “आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, यापुढेही काही दिलं नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
साताऱ्यात आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित हजारो लाडक्या बहिनींशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की,
“माझ्या बहीणी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात तेव्हा मला जास्त आवडतं. जर विकसित भारत घडवायचं असेल तर महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणल्याशिवाय हे होऊ शकतं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे. जोपर्यंत महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत हे होऊ शकत नाही. आता हळूहळू महिलांच्या जीवनात परिणाम होत आहे. आता पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभेत महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेत १०० महिला आपल्याला दिसतील.
“ज्यावेळी आम्ही एसटी तिकीटाचा निर्णय घेतला तेव्हा विरोधक आमच्यावर टीका करु लागले, पण एसटी यामुळे फायद्यात आली आहे. आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, यापुढेही काही दिलं नाही, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.