पाटण प्रतिनिधी । मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आहे. राज्य सरकारच्या या नोटिफिकेशनच्या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त करत झुंडशाहीच्या जोरावर कायदे करता येणार नाही. आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात टिकणार नाही, अशा शब्दात सरकारला सुनावले. दरम्यान, त्यांच्या या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटण येथे आज प्रतिक्रिया दिली. मागच्यावेळी सुप्रीम कोर्टाने ज्या कारणांनी निर्णय नाकारला त्या कारणाची मिमांसा करणारा सर्व्हे हा आपण अगोदर सुरू केलेला आहे. याबाबत भुजबळ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पाटण येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते. भुजबळ आणि राणे साहेब या दोघांनी देखील आपली मते मांडली आहे. आरक्षण प्रश्नबाबत दोघांशी देखील मी चर्चा करणार आहे. आम्ही नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आणून देऊ.
या ठिकाणी अतिशय चांगला सुमध्य आपण काढला आहे. त्यातून मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे. आणि इतर कोणत्याही समजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी कुठेही चिंता करण्याचे कारण नाही, असे मला वाटते, असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले.