सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखविले जात आहेत. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांकडून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान, सातारा शहर परिसरातील ६१ जणांनी जिल्हा पोलीस सार्वजनिक ठिकाणी वावर न करण्याचे आदेश सातारा पोलिसांकडून पारित करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापूसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८/०९/२०२३ रोजी गणेश विसर्जन असल्याने गणेश विर्सजना दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्या अनुषंगाने सातारा शहर व तालुक्यातील असलेल्या व सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगारावर सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांनी ६१ सराईत गुन्हेगाराना दि. २७ सप्टेंबर ते दि. २९ तारखेच्या सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुका हद्दीत थांबणेस मनाई आदेश जारी केला आहे. सदर कालावधीत नमुद सराईत गुन्हेगार सातारा तालुका हद्दीत मिळुन आल्यास त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचं आवाहन
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांना गणेश उत्सवादरम्यान प्रशासनाकडुन देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याचेवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.