पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता.
रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दरम्यान, पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरुच आहे. त्यांच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत.
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या अनुषंगाने वन्यजीव व्यवस्थापनाचे आव्हान वाढत आहे. त्या दृष्टीने शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या काही गावांमध्ये ‘प्रायमरी रिस्पॉन्स टीम्स’ तयार केल्या आहेत. वन विभागामार्फत वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.