कोंबड्या खाऊन निघालेल्या मादी जातीच्या बिबट्याचा उरुल-ठोमसे रस्त्यावर मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून रात्रीच्यावेळी पाळीव प्राण्यांवर हल्ला केला जात असल्याच्या घटना घडत आहेत. या दरम्यान शुक्रवारी उरूल परिसरात कोंबड्यावर हल्ला करून त्यांना खाल्यानंतर निघालेल्या नऊ महिन्यांची मादी जातीच्या बिबट्याचा उरुल-ठोमसे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. डोक्याजवळ अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला त्यानंतर शनिवारी नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मादी जातीच्या बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान तालुक्यातील उरुळी आणि ठोमसे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात ठोमसे येथील राहणारे विक्रम माने, आबा माने व राजेंद्र माने हे शुक्रवारी रात्री त्यांच्या घराकडे निघाले होते. ते रस्त्यावरून जात असताना पवार वस्तीजवळील रस्त्यावर त्यांना मृतावस्थेत पडलेला एक मादी जातीचा बिबट्या दिसून आला. यावेळी त्यांनी याची माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

रात्री दोनच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पवार मळ्यानजीक जाऊन तेथील दोन-तीन ग्रामस्थांना बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. रात्रीची वेळ असल्यामुळे तसेच बिबट्याची आई आसपास परिसरात असण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेत वनविभागाने बिबट्याला तेथून मल्हारपेठ येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. मादी जातीच्या बिबट्याच्या डोक्याला जोरदार इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.