सातारा प्रतिनिधी । सर्पदंश झाल्यानंतर बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे उपचारा अभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली आहे. चिमूरड्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मारीती झाला. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा चिमुरडा बळी ठरला असल्याने ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे.
अथर्व प्रमोद कवळे (वय ५, रा. शिरसवडी, ता. खटाव) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. १८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराजवळच हा मुलगा खेळत असताना त्याला सर्पदंश झाला. त्यामुळे त्याने धावत घरात येऊन आपल्याला साप चावल्याचे सांगितले. उजव्या हाताच्या बोटाला सापाचा दंश झालेला होता. त्याला सर्पदंश झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी ताबडतोब वडूजला धाव घेऊन सरकारी दवाखाना गाठला.
त्या ठिकाणी सर्पदंशाचे उपचार मिळायला हवे होते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या मुलाला सातारला सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले.त्यानंतर चिमुकल्यास खासगी वाहनाने सातारला नेण्यात आले. मात्र, योग्यवेळी उपचार न मिळू शकल्याने उपचाराअभावी तडफडून अधर्वचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.