कराड प्रतिनिधी | येथील बसस्थानक परिसरातील बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर रस्त्याकडेला बुधवारी (दि. १३) रात्री साडे आठच्या सुमारास एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार जगदाळे हे घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल आजुबाजुला चौकशी केली, मात्र मृताची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख पटली. अति मद्य प्राशन आणि उपाशीपोटी असल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे कारण वैद्यकीय तपासणीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिजीत रामचंद्र सोरटे (रा. येवती, ता. कराड), असे मृताचे नाव आहे. रात्री नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मृत अभिजीत यास दारू पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली. काल (बुधवारी) दिवसभर तो मद्यधुंद अवस्थेत होता. काहीही खाल्ले नव्हते. अति मद्य प्राशन आणि उपाशीपोटी अवस्थेत तो दिवसभर उन्हात रस्त्याकडेला पडून होता. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे कारण वैद्यकीय तपासणीत समोर आले. कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेची कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.