सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात अक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. तालुक्यातील पवारवाडी-बटई येथील मायलेकीचा मृतदेह त्यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला आहे. शोभा तानाजी गावडे (वय- 45) आणि साक्षी तानाजी गावडे (वय- 14) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. एकाचवेळी दोघींचा मृतदेह आढळून आल्याने घटनेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यात पवारवाडी बटई हद्दीतील शोभा गावडे यांचा शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला. विहिरीतील सर्व पाणी काढल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलगी साक्षी गावडे हिचा देखील मृतदेह विहिरीतील गाळात रुतलेला आढळून आला. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फलटण तालुक्यातील पवारवाडी येथील शोभा गावडे यांच्या पतीचे 6 वर्षापूर्वी अपघाती निधन झाले आहे. तर 2 मुलीचा विवाह झालेला असताना शोभा आणि साक्षी या मायलेकीचा मृतदेह आढळल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत फलटण पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.