पाटण तालुका हादरला ! एकाच कुटूंबातील 4 जणांचे घरात आढळले मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पावसामुळे ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना पाटण तालुक्यातील सणबूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह घरामध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आलेले आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबियांमध्ये आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी अशा सदस्यांचा समावेश आहे.

शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय 62), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय 45), विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी कुटुंबातील मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सणबूर येथे गावापासून काही अंतरावर रुवले रस्त्यावर जाणाऱ्या मार्गावर जाधव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. या कुटूंबातील वडील आनंदा जाधव हे शिक्षक होते. आनंदा पांडुरंग जाधव काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले. रात्री सणबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. लाईट नसलेमुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. आजारी व्यक्ती सोबत पत्नी, मुलगा व मुलगी व ते स्वतः असे चौघेजण या ठिकाणी होते.

Sanbur Crime News 1

गुरुवारी रात्री घरात कुटुंबातील सर्वजण एकत्र होते. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने गुरुवारी रात्री व पुन्हा शुक्रवारी सकाळी त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी फोन उचलत नसल्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यास सांगितले. यानंतर घराशेजारील काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा बंद होता व कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिले असता चारी जण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यानंतर या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली. दरम्यान काही वेळेपूर्वी पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात आहे.

Sanbur Crime News 2

संबंधित जाधव कुटूंबीय गावापासून बाहेर राहत असल्यामुळे हा नेमका कोणत्यावेळी प्रकार घडला? या कुटूंबियातील सदस्यांचे एकचवेळी मृतदेह कसे काय आढळले? हि घटना म्हणजे आत्महत्या आहे कि काही घातपात झाला आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सध्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.