कराड प्रतिनिधी | मृत्यू झाल्यानंतर संबंधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, पाटण तालुक्यातील चोरगेवाडीत आजही स्मशानभूमी अभावी मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांचा कालावधी लोटला असला तरी मृत व्यक्तींवर उघड्यावर पावसात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी दुर्गम विभागातून सुमारे 1 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
चोरगेवाडी गावात सुमारे 50 घरे असून साधारणतः 250 लोकसंख्या आहे. या गावाच्या बाजूचा भाग हा वनखात्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे जागा उपलब्ध होण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र, वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास असल्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. रानगवे, डुक्कर, वानरे, पोपट, कावळे, कबूतर, मोर असे अनेक पक्षी व प्राणी प्रचंड नुकसान करतात. परिणामी, अनेक लोक रोजगाराच्या शोधात मुंबई आणि इतर शहरात स्थलांतरित झाले आहेत.
गावात मुख्यत्वे वृद्धच नागरिक राहत असून गावात इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणतेही विकासकाम करायचे झाल्यास सभोवताली वनविभागाची जमीन असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. उदरनिर्वाहाचे साधनच शेती असल्याने कोणी सहजासहजी स्मशानभूमीसाठी जागा देण्यास तयार होत नाहीत. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. जर रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात एखाद्याचे निधन झाले, तर गावकर्यांना प्रेत खांद्यावर घेऊन मोठ्या कष्टाने एक किलोमीटर अंतर पार करावे लागते. शेताच्या बांधावरून चिखल तुडवट काट्याकुट्यातून अरुंद पायवाटेने मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेतात नेत दहन करावा लागतो. अनेकदा भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने मृतदेह पूर्णपणे जळत नाही आणि मृत व्यक्तीची विटंबना सुद्धा होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा रात्रीच्या वेळी मृत्यू झाल्यास नातेवाईकांसह ग्रामस्थांवर अक्षरशः संकट ओढवते. त्यामुळेच स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघणे आवश्यक आहे.