कराड प्रतिनिधी | दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला संशयित लपून छपून गावात वावरत असल्याची माहिती मिळताच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयिताला पाठलाग करून भर चौकात पकडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देवेंद्र अशोक येडगे (रा. जखिणवाडी, ता. कराड), असे संशयिताचे नाव आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आरोपी देवेंद्र अशोक येडगे (रा. जखिणवाडी, ता. कराड) याच्यासह दोन साथिदारांना पोलीस अधीक्षकांनी 2 वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून हद्दपार केले आहे. असे असताना देवेंद्र येडगे हा जखिणवाडी गावात लपून छपून वावरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांना कारवाई करण्याची सूचना केली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक जखिणवाडी गावात पोहचले. आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा येडगे हा गावचे चौकात बिरोबा मंदीर परिसरात दहशत माजवताना दिसला. पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. उपनिरीक्षक पतंग पाटील आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करुन आरोपीस भर चौकात पकडले.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस नाईक कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, यांनी ही कारवाई केली.