कराड प्रतिनिधी | मुंढे (ता. कराड) येथील पाण्याचे बंब चोरणाऱ्या संशयीतास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकले आहेत. आरिफ अब्दुल खलिद शेख (वय 40, रा. खाज्या झोपडपट्टी, मिरज, जि. सांगली), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तांब्याचे पाच बंब आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, असा 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ऐन थंडीत बंबांची चोरी
मुंडे (ता. कराड) या गावातून पाणी गरम करण्याचे तांब्याचे 5 बंब चोरीला गेल्याची घटना दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री घडली होती. आई थंडीच्या दिवसात बंब चोरीला गेल्याने नागरिक हवालदील झाले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिले होते.
गोपनीय माहितीमुळे मुद्देमालासह चोरटा सापडला
बंब चोरीचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम तीन तांब्याचे बंब मोटरसायकलवरुन दैत्य निवारणी मंदीर येथून घेवून जात आहे. त्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक पतंग पाटील आपल्या पथकासह दैत्य निवारणी मंदिर परिसरात दाखल झाले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते बंब चोरीचे असल्याचे त्याने कबूल केले. चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
डीबी शाखेकडून आणखी एक गुहा उघड
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आपल्या कामगिरी सातत्य ठेवले आहे. या शाखेने आणखी एक गुन्हा उघडकीस आणला आहे. उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.