कराड प्रतिनिधी । भाजपची परिवर्तन यात्रा सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम गावागावात जात आहेत. दरम्यान, परिवर्तन यात्रा आज कराड तालुक्यातील कोणेगाव येथे दाखल झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. “आमच्या कामांचे बॅंनर विद्यमान आमदारांनी लावले आहेत यापुढे असे चालू देणार नाही. अशा नाकर्त्या, निष्क्रिय बिनकामाच्या आमदाराला कायमचे हटवा, अशी टीका कदम यांनी यावेळी केली.
भाजप कराड उत्तर परिवर्तन यात्रा आज कोनेगावात दाखल झाली. यावेळी गावातील स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तन यात्रेचे व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, कराड उत्तर अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कोणेगाव येथील ग्रामस्थ, नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध मंजूर कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते करण्यात आले.