सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी घडली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीमध्ये शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या आहेत. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती नागरिकांनी खंडाळा पोलीस व अग्निशमन दलास दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम त्याच्याकडून करण्यात आले. या आगीत कंपनी शेजारील शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी भाजल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे प्लायवूड कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीच्या घटनेत कंपनीतील अनेक यंत्रणा आणि कच्चा माल आगीत जळून खाक झाला आहे. शेतकऱ्याने आगीमुळे मोठे नुकसान झाल्याबद्दल प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. तर प्लायवूड कंपनीच्या मालकाकडून आगीचे कारण तपासण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.