सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाशवाणी झोपडपट्टीतला सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, जबरी चोरी व मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये त्याला सातारा जिल्ह्यातुन तडीपार करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांच्याकडे सादर केला होता.
हद्दपार प्रस्तावाची डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांनी चौकशी केली होती. सराईत गुन्हेगार हा शरिराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करीत होता. कायदेशीर कारवाई करुनही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्ची मागणी होत होती. या बाबी लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी सराईत गुन्हेगार साहिल रणदिवे याला जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारिचा आदेश पारित केला.
उपद्रव्यी टोळयांमधील 58 जणांना नोव्हेंबर 2022 पासून तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.