वादळी पावसात झाडाखाली थांबणं जीवावर बेतलं, अंगावर वीज पडून क्रिकेट खेळाडूचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वळीव पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गारपिट झाली आणि अंगावर वीज पडून माण तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी पाटण तालुक्यातील मुट्टलवाडी-काळगाव येथे क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रोहन डांगे (वय २३, रा. हा मांगले, ता. शिराळा) असे मृत तरूणाचे नाव आहे.

घटनास्थळावरून तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुट्टलवाडी (काळगाव) ता. पाटण येथे क्रिकेट सामने सुरू होते. रविवार, दि.१९ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे सामना बंद करून खेळाडू सुरक्षित ठिकाणी जावू लागले. यापैकी काहीजण ग्राउंडच्या खालच्या बाजूच्या झाडाखाली थांबले होते. त्यातील रोहन डांगे या खेळाडूच्या अंगावर वीज कोसळली. त्याला तातडीने उपचारासाठी कराडला नेण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे ढेबेवाडी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान रोहन डांगे हा अतिशय चांगला क्रिकेट खेळाडू होता. त्याचे मुळगाव मांगले (शिराळा) हे असून तो विभागातील सतीचीवाडी- निवी (ता. पाटण) गावच्या संघात आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होता. आजच्या वादळी पावसात अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. यामुळे क्रिकेट प्रेमींवर शोककळा पसरली. या घटनेची नोंद आणि पंचनामा करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.