सातारा प्रतिनिधी | कोळकीकडून फलटण शहराकडे येणाऱ्या १८ चाकी कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉली, कार, पिकअप गाड्यांना धडक देत फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे संरक्षण कठडे तोडले. कंटेनर अगदी पुतळ्याजवळ जाऊन थांबल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. फलटण शहरातील मध्यवर्ती क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा प्रकार घडल्याने दुपारी भर उन्हात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेत कारमधील एक जण जखमी झाला असून, गाड्या, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
कंटेनर चालक देवीप्रसाद जगदेव यादव (वय ६२, रा. लवेदा, प्रतापगड, उत्तर प्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अठरा चाकी कंटेनर (एमएच ४९- ११२०) दुपारी सुमारे एकच्या सुमारास कोळकीकडून फलटण शहराकडे येत होता. कंटेनरचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटले होते.
कोळकी गावच्या हद्दीत अनंत मंगल कार्यालयासमोर एका विजेच्या खांबाला या कंटेनरने जोराची धडक दिली. यानंतर कंटेनरने कलिंगडाची विक्री करण्यास थांबलेल्या छोट्या ट्रॅक्टर व ट्रॉलीला, तसेच कारला धडक देत त्यांना फरफटत नेले.
ही धडक एवढी जोरात होती, की त्यात ट्रॅक्टरची चीसी तुटली व पुढील दोन चाके वेगळी होऊन पडली. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील कलिंगडांचे ही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर त्यालगत मोबाईलसाठी लागत असलेल्या साहित्याची विक्री करत असलेल्या एका विक्रेत्याच्या कारलाही जोरदार धडक बसल्याने कारमधील मालाचे व कारचे मोठे नुकसान झाले. या कारमधील एक जण जखमी झाला असून, त्यास तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.