कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 व्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष उभारण्याची उमेद शरद पवार यांच्या देहबोलीतून दिसत होती.
राष्ट्रवादीतील बंडानंतर आज शरद पवार यांनी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पवारांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितिसंगम या स्मृतीतळावरून एल्गार पुकारला. शरद पवार जेव्हा प्रीतिसंगमावर दाखल झाले तेव्हा त्यांना समाधीस्थळीपर्यंत ये-जा करण्यासाठी एक व्हॅन ठेवण्यात आली होती. या व्हॅनमध्ये त्यांच्या शेजारी काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बसले तर बाजूला बाळासाहेब पाटील.
प्रत्यक्ष समाधीस्थळी पवार साहेब जेव्हा दाखल झाले तेव्हा त्यांनीही पाठीमागे राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनासोबत घेत त्यांच्या हातात स्वतःच्या हातातील पुष्पचक्र दिले. तसेच स्वतः बाजूला उभे राहिलेल्या बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी एकत्रितपणे अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भक्कमपणे राष्ट्रीय पक्ष असलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीत आहेत. महाविकास आघाडी आहे तशीच राहणार आहे. पवार साहेबां सोबत आम्ही राहणार असून काहीही झालं तरी आम्ही ताकदीनं जातीयवादी भाजप पक्षाच्या विरोधात लढणार असल्याचे कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्रीतिसंगमावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, सत्यजित पाटणकर या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पक्षातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
तरीही आज पृथ्वीराजबाबा पवार साहेबांसोबत….
शरद पवार हे काँग्रेसमध्ये असताना तसेच राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सुद्धा राज्यात पृथ्वीराज चव्हाण हे पवार विरोधक म्हणून ओळखले जात होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. तसेच, काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, रविवारी घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील सर्व चित्र पालटले. अजित पवारांनी काकांशी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी व महाविकास आघाडी भक्कम ठेवण्यासाठी खुद्द पृथ्वीराज चव्हाण हे कराडात शरद पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले.
पृथ्वीराजबाबांनी पुष्पगुच्छ देत पवार साहेबांचं स्वागत…
पवार जेव्हा गांधी घराण्याला पहिल्यांदा 70 च्या दशकात आव्हान देत होते, त्या काळात पृथ्वीराज यांच्या आई प्रेमलाबाई इंदिरा गांधींसोबत होत्या. आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली. तेव्हा अनेक बडे नेते इंदिरा गांधींना सोडून गेले. तेव्हा प्रेमलाबाई इंदिरांसोबत गेल्या. त्यावेळी खा. शरद पवार देवराज उर्सांसोबत गेले होते. तेव्हापासून पवारांचे आणि गांधी घराण्याचे संबंध अविश्वासाचे आणि ताणलेले होते. मात्र, कराडमध्ये आज काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे खा. शरद पवारांच्या स्वागतासाठी दाखल झाले. त्यांनी पवार साहेबांचे स्वागत करत महाविकास आघाडी भक्कम ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू असा विश्वास दिला.