कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज वर्धापन दिन पार पडला. या वर्धापनदिनी पवार गटाला भाजपने चांगलाच धक्का दिला. पवार गटाचे निष्ठावंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्यानंतर काही तासांनी पाटण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील बापू यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. हिंदुराव पाटलांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशानंतर ढेबेवाडी खोऱ्यासह कराड आणि पाटण तालुक्यातील काँग्रेसला खिंडार पडले आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, राजाभाऊ शेलार यांच्यासह पाटणकर गटातील कार्यकर्त्यांते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुराव पाटील गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या मेळात कोठेच दिसत नव्हते. ते भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा ही सुरु झाल्या होत्या. त्यांनी तसा निर्णय घेतलाच तर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातही राजकीय भूकंप होईल असे बोलले जात होते आणि तसेच झाले. अखेर पाटलांनी पृथ्वीराज बाबांची साथ सोडत कमळ हाती घेतलं.
पाटण तालुका जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तो वेगवेगळ्या खोऱ्यात विखुरलेला आहे. त्यापैकीच एक खोरे म्हणजे ढेबेवाडी होय. येथील बहुतांश लोक मुंबईत उपजिवेकेसाठी आहेत.अनेक वाड्या वस्तीत येथील लोक रहातात.पण येथील जनता राजकीय दृष्ट्या जागृत मानली जाते. खरंतर हा भाग पूर्वी कराड दक्षिण मतदारसंघात होता. त्यावेळी विलासराव पाटील उंडाळकर या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. त्यामुळे येथे काँग्रेसची पाळेमुळे चांगली रोवली गेली होती.तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मुळ कुंभारगाव सुध्दा याच खोऱ्यात येते त्याचाही प्रभाव येथे दिसून आला. म्हणून तर पुढे पाटण तालुक्याचे राजकारण देसाई- पाटणकर गटाभोवतीच फिरत असताना हिंदुराव पाटील यांनी अनेक वर्ष येथे जिल्हा परिषद गटावर आपला प्रभाव कायम ठेवला होता.
आता मात्र याच पाटलांनी काँग्रेस व नेत्यांवर नाराजी दाखवत पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि आपला मार्ग बदलला. महिन्याभरापूर्वी भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. त्यात ढेबेवाडी साईगडेचे गणेश यादव भाजपचे तालुकाध्यक्ष झाले. विशेष म्हणजे या अध्यक्षांच्या चक्क हिंदुराव पाटील यांनी सत्कार केला. तो फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाला. त्यामुळे पाटीलही भाजपच्याच वाटेवर असल्याच्या चर्चां सुरु होत्या. आता प्रत्यक्ष पक्ष प्रवेश करत पाटलांनी चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
अशी आहे राजकीय कारकीर्द…
हिंदुराव पाटील हे काँग्रेसच्या नेत्या प्रेमालाताई चव्हाण यांच्या पासून राजकारणात सक्रिय आहेत.सुरुवातीला त्यांनी पाटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले.त्यानंतर तब्बल २० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपद भूषवले. सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग संस्थेचेहीचे ते अध्यक्ष राहिले. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले. आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.