भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; जिल्हाधिकारी डुडींचे महसूल यंत्रणेला आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी दिला जात आहे. सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी संबंधित विभागाकडून रेड अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा दिला जाईल अशावेळी पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यातील भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागास दिले आहेत.

जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी नुकताच संवाद असधला. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे संभाव्य भूस्खलन/ दरडी कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी हि संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची आहे. यामध्ये हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. वेळोवेळी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्हयात रेड अलर्ट व ऑरेन्ज अलर्ट घोषीत करण्यात येतात.

या कालावधीत जिल्हयात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत होते व नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच पश्चिम भागातील तालुक्यामध्ये संभाव्य भूस्खलन / दरडी कोसळून जिवित हानीचा धोका निर्माण होतो. सदर धोका टाळणेसाठी तेथील नागरिकांना विहित वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन आवश्यक त्या सोई-सुविधा व निवाऱ्याची व्यवस्था तातडीने करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी सदर धोकादायक दरडग्रस्त व भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावांना भेटी देवून तेथील नागरिकांना विहित वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे, या अनुषंगाने जिल्हाधिकारी डुडी यांनी आदेश दिलेले आहेत.