कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांची बियाणे, खते, व किटकनाशके या कृषि निविष्ठांमध्ये फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कृषि विभागाने काटेकोर दक्षता घ्यावी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही. गुणवत्ता नियंत्रणामध्ये ज्या बियाणे, खते, आणि किटकनाशकांचे नमुने अप्रामणित आढळून ज्या कंपन्या कोर्ट केस पात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कृषि निविष्ठा पुरवठादारांनी जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद विजय माईनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, पोलीस उप अधिक्षक के.एन. पाटील, मोहीम अधिकारी दत्तात्रय येळे, गुणनियत्रण निरिक्षक संजय फडतरे, महाबीज चे सुनिल पारधे, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे दिलीप झेंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याला झालेल्या कृषि निविष्ठांची मागणी पुरवठा, गुणवत्ता यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात बियाणे, रासायनिक खते, मागणीच्या प्रमाणात विपुल असल्याचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात बियाणे विक्रीचे 1 हजार 263 रासायनिक खते विक्रीचे 1 हजार 479, तर किटकनाशके विक्रीचे 1 हजार 188 परवाने आहेत त्यांची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अशा एकूण 36 गुणनियंत्रण निरिक्षकांमार्फत नियमित तपासणी करण्यात येते, असे जिल्हा अधक्षिक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.
तालुका व जिल्हा स्तरावर 12 पथके
तालुका व जिल्हा स्तरावर 12 पथके नेमलेली असून आतापर्यंत तपासणी मध्ये अनियमितता आढळून आलेल्या 14 कृष्षि सेवा केद्रांवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. 4 कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. सर्व खते, बियाणे, किटकनाशके कंपन्यांनी जिल्ह्यात दर्जेदार व उत्तम गुणवत्तेच्या कृषि निविष्ठा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
कृषि सेवा केंद्रात ‘इतक्या’ क्षमतेने खते उपलब्ध
खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्ह्याला 115.10 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त असून आज अखेर 113.77 मेट्रिक टन खत उपलब्ध झालेले आहे यामध्ये युरिया 38 हजार 899 मे. टन, डीएपी 14 हजार 683 मे. टन म्युरेट ऑॅफ पोटॅश 2 हजार 191 मे. टन सुपर फॉस्पेट 15 हजार 749 मे टन, तर इतर संयुक्त खते 42 हजार 249 मे. टन याप्रमाणे खते कृषि सेवा केंद्रात उपलब्ध आहेत.
60 टक्के बियाणांची विक्री
चालू हंगामात जिल्ह्याची एकूण बियांणाची मागणी 47 हजार 331 क्विंटल आहे. आज अखेर 45 हजार 755 क्विंटल पुरवठा झालेला आहे. यामध्ये ज्वारी 1202 क्विंटल, बाजरी 1795 क्विंटल, भात 11 545 , घेवडा 2489 क्विंटल, मका 9432 क्विंटल, उडिद 337 क्विंटल, मुग 621 क्विंटल, सोयाबीन 15127 क्विंटल, वाटाणा 3186 क्विंटल, बियाणांचा पुरवठा झालेला आहे. 60 टक्के बियाणांची विक्री झाली असून अनेक शेतकऱ्यांकडे स्वत:ची बियाणे आहेत. जिल्ह्यात बियाणांचा मागणीप्रमाणे पुरवठा झालेला आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे ग्रेड निहाय नियोजन करण्यात आले आहे.