सातारा प्रतिनिधी | महिलांना व मुलींना असुरक्षिततेची थोडी जरी भावना निर्माण झाली तर महिलांसाठी सुरु करण्यात 181 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून सातारा पोलीस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी प्रकल्प सक्षमपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने पाठलाग केल्यास क्युआर कोडच्या ट्रॅकींग यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग करण्यात येणार आहे.
पोलीस विभागाकडून स्वतंत्र भरोसा केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहे. यामध्ये कर्तव्यावर महिला अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तक्रारदार महिलांसाठी अभ्यागत कक्ष, महिलांचे समुपदेशन, महिलांना तात्काळ वैद्यकीय उपचार, कायदेशीर बाबींची सोय, मनौधैर्य योजना पुर्तता, पिडीत महिला व बालकांसाठी तात्पुरता निवारा व जेवणाची सोय अशा सोयी सुविधा भरोसा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
सातारा पोलीस दलाकडून अभया हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने पाठलाग केल्यास क्युआर कोडच्या ट्रॅकींग यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. एकूण 690 बसेसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांना तात्काळ मदत पुरविण्यासाठी गुलाबी स्कुटी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 हजार 742 युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बालकांचे हक्क व सुरक्षितता अंतर्गत 3 लाख 51 हजार 750 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात निर्भयापथक कार्यक्षम असून सन 2021 पासून जुलै 2024 अखेर 46 हजार प्रकरणांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा 110/27 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायद्याप्रमाणे 8 हजार 408 कार्यवाही करण्यात आली आहे. 28 हजार 482 जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. 3 हजार 729 एवढे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाचे व पोलीस विभागाचे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच सर्वोच्य प्राधान्य राहिले आहे. असुरक्षितता वाटल्यास मुली, महिलांनी 181 या महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. पोलीस विभागाकडून तक्रारदार महिलेला तात्काळ प्रतिसाद दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.