पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणासह पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित सभाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्ह्णून काम करत आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही तर जनतेत, सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करणारा मी मुख्यमंत्री आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
पाटण येथील कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, रविराज देसाई, यशराज देसाई, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल आदींसह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानाच मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही का? आज मी तुमच्यातील सर्वसामान्यातील आहे. म्हणून मला दुःख वेदना कळतायत आणि त्यातून मी समजून घेतोय. म्हणून हा एकनाथ शिंदे चोवीस तासात १८ ते २० तास काम करतो.
सर्वसामान्यांमध्ये जातो, शेतात जातो, बांधावर जातो आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवतो. त्यामुळे माझ्यावर कितीही आरोप केले तरी मला त्याचे काहीही नाही. मी आरोपाला उत्तर आरोपाने देणार नाही मी कामातून उत्तर देणार आहे. कारण आम्ही एवढे निर्णय घेतले आहरेत कि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.