सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर शनिवारी स्थानिक व वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या रस्त्याच्या कठड्यावरुन चालत निघाला होता.
वाहनांची चाहूल लागताच त्याने रस्ता ओलांडून डोंगराच्या दिशेने घनदाट झाडीत धूम ठोकली. गेल्या चार दिवसांपासून शाहूनगरमध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बिबट्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खिंडवाडी, अजिंक्यतारा किल्ला, महादरे तलाव परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आहे. आता हे बिबटे लगतच्या लोकवस्तीसह शेतामध्येही आढळून आले आहेत. शाहूनगर परिसरातील कॉलन्यांमध्येही बिबट्या धूडगूस घालत आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी बिबटे लोकवस्तीत घुसत आहेत. शनिवारी पहाटे शहराकडून अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्यावर बिबट्या दिसला. शासनाच्यावतीने किल्ल्याकडे जाणार्या रस्त्याची डागडुजी केली आहे.
या सिमेंटच्या रस्त्यावरच बिबट्या बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसले. लोकांची चाहूल लागली की तो घनदाट झाडीत लपून बसतो. शनिवारीही वाहनाच्या उजेडात हा बिबट्या रस्त्याच्या कठड्यावरुन फिरताना दिसला. वाहनासमोरुनच त्याने डोंगरावरील घनदाट अरण्यात धाव घेतली.
वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी वनविभागाचे वाहन किल्ला परिसरात दाखल झाले. वन कर्मचार्यांनी घटनास्थळी बिबट्याचा शोध घेतला. बिबट्याचे ठसे घेण्याचे काम हाती घेतले. तसेच परिसरातील झाडांवर खानाखुणा आढळतात का? याची पाहणी वनविभागाच्या कर्मचार्यांनी केली.दरम्यान, सकाळी लवकर व सायंकाळच्या वेळेत किल्ल्याच्या रस्त्यावर फिरायला येणार्या नागरिकांना सावध राहण्याचे व वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.