कराड प्रतिनिधी | तारळे विभागातील कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित गौतम अदानी ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत काल प्रकल्पच्या ठिकाणी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून प्रकल्पास तीव्र विरोध केला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काल मंगळवारी प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी कळंबे येथे जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, किरण लोकरे, प्रशांत पवार, शिवाजी राऊत, अजित पाटील (चिखलीकर), सुशांत मोरे, अभिजित जाधव, ॲड. आत्माराम कांबळे, ॲड. सिद्धेश पवार, अॕड. चेतन कणसे, अॕड. सौरभ देशपांडे, तारळे विभागातील प्रमुख पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ, निसर्गप्रेमी व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पाच्या कंपनीच्या वतीने प्रोजेक्टरवर प्रकल्प वाचनास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरुवात करताच उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी तीव्र विरोध केला. प्रकल्पाचा चुकीचा सर्व्हे असून याला काय आमचा विरोध राहील असे नागरिकांनी सांगितले.
पाटण तालुक्यातील कळंबे येथे उद्योगपती गौतम अदानी यांच्या १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रस्तावित करण्यात येणार आहे. या प्रकल्प उभारणीस येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्प विरोधात काही हरकरती असल्यास त्या दाखल करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मागील महिन्यात केले होते. त्यानुसार लोकांना मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या. तसेच हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याची जाणीव झाल्याने व याचे भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला. तसेच या प्रकल्प विरोधात हजारो हरकती दाखल केल्या.
‘या’ विभागातील अधिकाऱ्यांची जनसुनावणी दांडी
मंगळवारी कळंबे येथे पार पडलेल्या जनसुनावणी वनविभाग, कृष्णा खोरेचे अधिकाऱ्यांनी अनुपस्थित लावली होती.
प्रकल्पास विरोध ‘ही’ आहेत मुख्य कारणे…
अदानींच्या प्रकल्पास विरोध करण्याची मुख्य कारणे अनेक आहेत. त्यामध्ये वनजमीन, इकोसेन्सेटिव्ह झोन, पावसाळ्याचा सर्व्हे, गौणखनिज उत्खनन, पशुपक्षी, धरणातील माशांच्या प्रजाती, बाधित लोकसंख्येची आकडेवारी, परिसरातील पीक उत्पादन, धार्मिक स्थळांना धोका, काम करताना ब्लास्टिंगचे तारळी धरणाच्या भिंतीसह जलस्रोत व घरांचे नुकसान, भूकंपप्रवण क्षेत्र, हिंस्र प्राण्यांचे स्थलांतर, या प्रकल्पामुळे तयार होणारे दूषित पाणी, रोजगार निर्मिती, सीएसआर फंड यासह अनेक चुकीच्या गोष्टींचा सर्व्हेत समावेश करण्यात आला आहे. या मुख्य कारणावरून लोकांनी सर्व्हेवर आक्षेप घेत प्रकल्पास विरोध केला.
हा प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारा : देवराज पाटील
काल कळंबे येथे गौतम अदानी यांच्या प्रकल्पाबाबत जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणी आम्ही उपस्थित राहिलो होतो. हा प्रकल्प पूर्णतः पर्यावरणाची हानी करणारा आहे. या प्रकल्पास आमचा सुरुवातीपासून विरोध असून यापुढे देखील राहणार असल्याचे कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.