कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील चिटेघर-साखरी प्रकल्पग्रस्तांनी रखडलेल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलिस फौजफाट्याला व प्रशासनाला न जुमानता महिला व पुरुष धरणग्रस्तांनी बॅरिकेड्स ढकलून धरणाच्या दिशेने धावत पळत जाऊन धरण फोडण्यासाठी धावपळ केली. अचानक केलेल्या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडून गेला. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांना मदतीला घेऊन प्रकल्पग्रस्तांना अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धरणस्थळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुदतीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर धरणग्रस्त शांत झाले.
धरणग्रस्तांच्या या आंदोलनामुळे पाटण तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील चिटेघर-साखरी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम १९९९ रोजी सुरू झाले. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात पाणीसाठा साठवला असून, ६०० ते ६५९ एकर क्षेत्र बागायतदार झाले. मात्र, पाटण, सातारा, पुणे, मुंबई येथील अधिकाऱ्यांनी गेल्या २३ वर्षांपासून बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोबदला दिला नाही.
त्यामुळे पाटण, सातारा, पुणे, मुंबई असा शासकीय प्रवासात हेलपाटे मारून संतापलेल्या धरणग्रस्तांनी अखेर सकाळी ११ वाजता चिटेघर धरण फोडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. धरणस्थळी जमलेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या भिंतीवर जाऊन धरण फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भिंतीवर संरक्षणासाठी उभारलेले बॅरिकेड्स ढकलले आणि धावपळ सुरू केली. अचानक निर्माण झालेल्या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली.
यावेळी पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांशी संवाद साधल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी धावत पळत चिटेघर गाठले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा केल्यानंतर पंधरा दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.