म्हसवडमधील खासगी डॉक्टरांच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू?, थेट पालकांनी केला गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील खडकी येथील सहा वर्षांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होतोय म्हणून म्हसवडमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. तर याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सम्यक दत्तात्रय बनसोडे (वय ६, रा. खडकी, ता. माण) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सम्यक बनसोडे याला बुधवारी रात्री जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी म्हसवडमधील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेले. सकाळी पुन्हा तोच अन् अधिकचा त्रास सम्यकला होऊ लागल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळास जुलाबाच्या साध्या आजारातही आपल्या जिवाला मुकावे लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आजारी असतानाही आजी, आई – वडील अन् नातेवाइकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत चांगल्या प्रकारे बोलत, गप्पा मारत होता. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार घडताच व संबंधित डॉक्टरानी हे प्रकरण उघडकीस येऊ नये, म्हणून मुलगा मयत असतानाही त्यांच्या नातवाइकांसह पुढील उपचाराचे कारण पुढे करून म्हसवड येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यास सांगितल्याचेही सम्यकच्या पालकांनी सांगितले.

त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सम्यकला मृत घोषित करण्यात आले, असे मुलाच्या पालकांनी सांगितले. या प्रकारामुळे नातेवाइकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी म्हसवड पोलिस ठाण्यात शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सम्यकच्या मृत्यूची नोंद आकस्मिक म्हणून करण्यात आली आहे.