पाटण प्रतिनिधी | मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील उमरकांचन गावाजवळ घडली. ओंकार रमेश भिंगारदेवे (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत मंगळवारी दुपारी गावाजवळच्या वांग नदीपात्रात पोहायला गेला होता. त्यांच्यापैकी कुणालाही पोहता येत नव्हते. मराठवाडी धरणाच्या जलाशयाचा हा भाग असून, पूर्वी त्याठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पाण्यात खोल खड्डे आहेत. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ओंकार बुडाला. तेथे असलेल्या मुलांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना त्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, तो आढळून आला नाही.
दरम्यान, सकाळी कराडहून आलेल्या मच्छीमारांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जलाशयातील खड्ड्यात शोध मोहीम राबवून ओंकारचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्याचा मृतदेह कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ओंकार ढेबेवाडी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रशांत चव्हाण, नवनाथ कुंभार, धीरज मुळे, गणेश किर्दत, पोलिस पाटील विष्णू पुजारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.