पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदारसंघातील पहिले शिवतीर्थ असलेल्या नाडे-नवारस्ता येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यास पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थिती लावली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मन:पूर्वक वंदन केले. तसेच यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस दल व पोलीस बँडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना मानवंदना देण्यात आली. तसेच श्री छावा युवा मंच (अतित, जि. सातारा) यांच्यावतीने शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची प्रात्यक्षिके आणि शाहीर शुभम विभुते व चमू (जि. सांगली) यांचा पोवाड्याच्या कार्यक्रम पार पडला.