सातारा प्रतिनिधी | वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्यामुळे (चेक बाऊन्स) जिल्ह्यातील ४८८ ग्राहकांना तीन लाख ६६ हजार रुपयांचा बँक चार्जेसचा भुर्दंड बसला आहे. विविध कारणांसाठी धनादेश वठत नसल्यामुळे ग्राहकांनी महावितरणचा वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनसह अन्य पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे.
महावितरणने वीजबिल ‘भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत, तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष रोख रकमेद्वारे वीजबिलाचा भरणा करण्यासाठी सेंटर्सही उपलब्ध करून दिले आहेत, तरीही अनेक ग्राहक वीजबिल भरण्यासाठी अद्यापही धनादेशाचा वापर करत आहेत.
त्यापैकी गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब ग्राहकांनी वीजबिलापोटी दिलेले तब्बल ४१ कोटी ८९ लाख रुपयांचे १६ हजार १४१ धनादेश विविध कारणांमुळे वठलेले नाहीत. त्यामुळे या सर्व ग्राहकांना बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून एकत्रितपणे तब्बल एक कोटी २१ लाख पाच हजार ७५० रुपयांचा नाहक दंड भरावा लागला. त्याचबरोबर वेळेत बिलाचा भरणा न झाल्यामुळे त्यांना १.२५ टक्के विलंब आकार शुल्क देखील भरावे लागले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत सातारा जिल्ह्यातील ४८८ ग्राहकांचे धनादेश वठलेले नाहीत. त्यामळे या ग्राहकांना तीन लाख ६६ हजार रुपये दंडाचा फटका बसलाच; परंतु त्यानंतर वीजबिलाचा भरणा करताना १.२५ टक्के जादा बिल भरावे लागले आहे. महावितरण कंपनीने वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’ सह ‘ईसीएस’, ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या पर्यायांचा वापर करत ग्राहकांनी दंड व विलंब आकार टाळावा, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
का बसतोय दंड ?
धनादेश न वठण्यासाठी चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीचौ स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधित खात्यात रक्कम नसणे अशी कारणे कारणे दिसून दिसून आली आहेत. त्याचबरोबर धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो, तसेच धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसत आहे.