पाटण प्रतिनिधी | लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी नवारस्ता (ता. पाटण) येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प आपल्या वाढदिनी केला होता. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार यशराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती गठीत करण्यात आली आहे.
पाटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने यशराज देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून संकल्प केला होता. देसाई कुटुंबिय हे छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याने भारलेले असून त्यांच्या प्ररणेनेच जनसेवेत सक्रिय आहेत.
लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व छ. शिवाजी पार्क, कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. आजही त्या दोन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देतात. लोकनेत्यांचा वारसा जपताना पाटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाडे-नवारस्ता येथील मुख्य चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प यशराज देसाई यांनी केला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत . यशराज देसाई यांची समितीच्या अध्यक्षपदी, विजय पवार यांची उपाध्यक्षपदी, माणिकराव पवार यांची सचिव/खजिनदारपदी तर सुमेध साळूंखे, विलास गोडांबे,मनोज मोहिते, जगदिशसिंह पाटणकर, शैलेंद्र शेलार, गणेश भिसे, बशीर खोंदू आणि श्रीमती मुक्ताबाई माळी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.